कोरोना महामारीचे गांभीर्य
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजप युवा नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
सभागृह नेते परेश ठाकूर यांचा 18 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात, मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रसार पाहता सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. सर्व जण कोविड-19 या जागतिक संकटाचा सामना करीत आहेत. सर्व स्तरावर त्यावर मात करण्याचे युद्धपातळीवर अविरतपणे प्रयत्न होत आहेत. शासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध सर्वत्र लागू केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय परेश ठाकूर यांनी घेतला आहे, परंतु वाढदिवसानिमित्त 6 जून रोजी पनवेल परिसरात किमान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
कोविड महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी यंदाही वाढदिवस साजरा करणार नाही. कोणीही, कोठेही आणि कोणत्याही स्वरूपात माझा वाढदिवस साजरा करू नये, तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची तसदी घेऊ नये. स्वतःची, कुटुंबाची आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका