अहमदनगर : प्रतिनिधी
आत्महत्या केलेले शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करणार असल्याचे आश्वासन, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या वेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखांची मदत केली.
शेतकर्यांनी आत्महत्या करु नये म्हणून मल्हारी बटुळे यांच्या तिसरीत शिकणार्या मुलाने एक कविता रचली आणि शाळेत सादर केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच दिवशी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या करुन आयुष्य संपविले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 1) या बटुळे कुटुंबीयांची भेट घेतली. मल्हारी बटुळे यांच्या आत्महत्येवर बोलताना प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधाला. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी केली असती तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळे मल्हारी बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांनी म्हटले. सोबतच ठाकरे सरकारची कर्जमाफी ही फसवी असल्याचे सांगत हे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.