Breaking News

माथेरान पर्यटन क्षेत्रातील ‘तो’ चढाव होणार कमी

एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात

कर्जत : बातमीदार

माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या लाल माती मधील तीव्र चढावाच्या रस्त्यावरील चढाव आणखी कमी होणार आहे. घोडे आणि हातरीक्षा यांच्यासाठी हा तीव्र चढाव तेथून प्रवास करताना शरीरातील सर्व ताकद एकवटून घेत असतो.त्यामुळे माथेरान नगरपरिषदकडून एमएमआरडीएला रस्त्यावरील चढाव कमी करण्यास सांगितले असून त्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सरकारी यंत्रणेच्या ताब्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. या माथेरान मध्ये ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे, त्यामुळे सामान सुमान हे हातगाडीमधून तर वयस्कर पर्यटक यांच्यासाठी चार माणसे ओढत असलेली हात रिक्षा टॅक्सी स्टँडपासून सेवा देत असते. परंतु टॅक्सी स्टँडपासून पुढे अमन लॉज स्टेशननंतर सुरू होणारा महात्मा गांधी रस्ता हा हातरीक्षा, हातगाडी आणि घोडे यांची दमछाक करणारा आहे. या रस्त्यावर काळोखी परिसरात असलेला तीव्र चढावाचा रस्ता पर्यटकांची ने आण करताना, सामानाची ने आण करताना ही वाहने घेऊन जाणारे यांची दमछाक करीत असतो. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण आणि पर्यावरण संतुलित विकास करण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्या निधीमधून अमन लॉजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक असा साडे चार किलोमीटरचा रस्ता धूळ विरहित केला जाणार आहे.त्यात काळोखी येथील तीव्र चढावाचा भाग कमी उताराचा करण्यसाठी दगडी गॅबीयन बांधून रस्त्याची उंची वाढविण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील चढाव कमी करण्याची मागणी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदकडून एमएमआरडीएला करण्यात आली होती.

एमएमआरडीएने रस्त्यावरील चढाव कमी करण्यासाठी मोजमापे घेऊन उपस्थित ठेकेदार यांना चढाव आणखी किती कमी करायला हवा याबाबत सूचना केल्या. त्यामुळे पुढील दीड महिन्यात ख्रिसमस हंगाम सुरू होण्याआधी माथेरान च्या मुख्य रस्त्यावरील तीव्र चढावाचा रस्ता घोडे, हातरीक्षा आणि हातगाडी ओढणारे यांच्यासाठी कमी श्रम घेणारा ठरणार आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply