जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे मत; अलिबाग प्रेस असोसिएशनच्या तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण
अलिबाग : प्रतिनिधी
काळ बदलला असला तरी महिलांसमोरील आव्हाने कमी झालेली नाहीत, ती आजही कायम आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यासाठी मुले आणि पुरुषांचे प्रबोधन व्हायला हवे, असे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 7) व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने शनिवारी घेण्यात तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी निधी चौधरी बोलत होत्या. निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे उपस्थित होते. या समारंभात सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मनेका खाकोन फोईद्दर, कृषिकन्या रसिका फाटक, गॅस सिलेंडर वितरणाची जबाबदारी पेलणार्या कल्पना हिलाल आणि आदर्श नागरी पतसंस्थेच्या मीनाक्षी पाटील या चौघींना तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वैदिक काळात भारतीय महिलांना समाजात बरोबरीचे स्थान होते. नंतरच्या काळात महिलांची सामाजिक परिस्थिती बदलली. महिला घरांच्या चौकटीत बंद होत गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा महिलांची सामाजिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. आज पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करीत असल्या तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. त्यांच्यावरील अत्याचार थांबलेले नाहीत. ही परिस्थिती जोवर बदलणार नाही. महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत, तोवर महिला सक्षमीकरण झाले असे म्हणता येणार नाही. मुलींना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र द्यायला हवे, यासाठी पुरुषांची मानसिकता बदलायला हवी, असे निधी चौधरी या वेळी म्हणाल्या. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणार्या या उपक्रमाचे कौतुक करुन जिल्हाधिकारी चौधरी यांनी तेजस्विनी पुरस्कार विजेत्या महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभाचे सूत्रसंचालन महेश पोरे यांनी केले. या वेळी अलिबागमधील पत्रकार, तसेच पुरस्कार विजेत्या महिलांचे नातेवाईक, तसेच निवडक सहकारी उपस्थित होते.