खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावर ठाणे-पारनेर एसटी बसला शनिवारी (दि. 7) पहाटे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. एसटी चालक भाऊसाहेब गोरक्षनाथ शिरसाठ (वय 33, रा. बीड) यांनी खालापूर टोल नाक्यावर एसटीचा वेग कमी केला. त्याचवेळेस पाठीमागून वेगात आलेला ट्रक चालक अब्दुल हमीद सन्नकी (रा. कोल्हापूर) याला वेग नियंत्रित न करता आल्याने ट्रकची एसटीला जोरदार धडक बसली. या धडकेत एसटीची मागील बाजू चेपली जावून पाठीमागील आसनांवरील तीन प्रवाशांसह ट्रक चालक अब्दुल, क्लिनर संदिप लांडगे आणि एसटी चालक शिरसाठ जखमी झाले. एसटी चालक शिरसाठ यांनी या अपघाताची खबर खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.