व्यासपीठावरील कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे खडे बोल; शेकाप नेते, कार्यकर्ते अनुपस्थित
कर्जत : बातमीदार
कर्जत येथे बुधवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीच्या संवाद सभेचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला. कार्यकर्त्यांची अपुरी उपस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना
स्वतःला आवरता आले नाही. व्यासपीठावरून पवार यांनी खडे बोल सुनावल्याने कार्यकर्ते रिचार्ज होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आघाडीच्या संवाद सभेला शेतकरी कामगार पक्षाचा कर्जत तालुक्यातील कोणताही कार्यकर्ता उपस्थित नव्हता.
या संवाद सभेला अजित पवार यांच्यासारखा बडा नेता येत असताना सहाच्या सभेला सात वाजले तरी रॉयल गार्डनच्या लॉनवर लावलेल्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे काहीसे उशिरा व्यासपीठावर पोहचलेले अजित पवार यांनी आमदार सुरेश लाड यांच्यानंतर थेट माईकचा ताबा घेतला.
भाषण सुरू असताना अजित पवार यांनी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना कर्जत विधानसभा मतदारसंघात किती मतदार आहेत अशी माहिती विचारली. त्यावर काही कार्यकर्ते मतदान केंद्रांची संख्या सांगत होते, तर काही चुकीची मतदारसंख्या सांगत होते. त्यावेळी अजित पवार यांनी प्रथम आपल्या स्वीय सहाय्यकांना माहिती देता येत नाही का, असे विचारून मला चुकीची माहिती दिलेली आवडत नाही, असे सांगून तुम्हाला हे माहीत पाहिजे, असे खडे बोल माईकवरून सुनावले.
कर्जतमध्ये पराभव झाला असला तरी त्यातून काहीतरी शिकले पाहिजे व नवीन मित्र जोडले पाहिजेत. आपल्याला प्रथम देश व नंतर महाराष्ट्र काबीज करायचा आहे, अशी साद अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली.कर्जतमधील रॉयल गार्डनच्या लॉनवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-शेकाप यांच्या आघाडीची संवाद सभा आयोजित केली होती. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकशाही आघाडीचे संभाव्य उमेदवार पार्थ अजित पवार, कर्जतचे आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांच्यासह काँग्रेस,
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र शेतकरी कामगार पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. सुरुवातीला आमदार सुरेश लाड यांनी प्रास्ताविक केले.