Breaking News

शेकापचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत…; मग कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे का नाही परत करीत?

पनवेल : रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत, मग ही मंडळी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे का परत करीत नाहीत, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. कर्नाळा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि. 15) खांदा कॉलनीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.

शेकाप नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी तब्बल 512 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा घोटाळा करून हजारो ठेवीदार व खातेदारांना मोठ्या संकटात टाकले आहे. कर्नाळा बँकेतील घोटाळा आणि ठेवीदारांवर ओढवलेले संकट शेकापला माहीत आहे का? असेल तर शेकापचे नेते या प्रकरणात का गप्प बसले आहेत, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी करीत या प्रकरणात सत्तेचे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप केला.

या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, कुंडलिक काटकर उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेकापच्या नेत्यांना कर्नाळा बँकेत 512.54 कोटींचा भ्रष्टाचार झाला अशी सहकार खात्याने तक्रार दिली हे माहीत आहे का?, विवेक पाटील व शेकाप पदाधिकार्‍यांना पक्षाचा पाठिंबा आहे का? की ते निष्पाप आहेत अशी शेकापची भूमिका आहे?, नसल्यास विवेक पाटील व स्वतःच्या खात्यातून संगनमताने ठेवीदारांच्या पैशांची लूट करू देणार्‍या शेकाप पदाधिकार्‍यांवर पक्ष कोणती कारवाई करणार आहे?, शेकापने आपण महाविकास आघाडीचा घटक असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. त्या महाविकास आघाडीच्या सरकारमार्फत ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी शेकापने काय पावले उचलली आहेत?, विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांमध्ये बेनामी 63 कर्ज खात्यांतून पैसे वळवले, असे पोलीस व सहकार खाते म्हणते. या पैशांचे नेमके काय झाले? असे प्रश्न उपस्थित केले. शेकापला नीतिमत्तेची खरंच चाड असेल, तर त्यांनी आम्ही केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान दोन्ही आमदारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेकापला दिले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हटले की, नवी मुंबईत शेकापचे अस्तित्व जवळपास नसल्यासारखे आहे. तरीही एकीकडे अनेक ग्रामपंचायती, गावकी व संस्थांचे पैसे कर्नाळा बँकेत अडकले असताना दोन दिवसांपूर्वी शेकापच्या काही पदाधिकार्‍यांनी नवी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तेथील महानगरपालिका निवडणुकीत 111 जागा लढवण्याची घोषणा केली. शेकाप हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात कार्यरत असून या जिल्ह्यात अनेक वेळा त्यांचे आमदार, खासदार, जि. प. अध्यक्ष निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरही शेकापने वर्चस्व ठेवले आहे. रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईतही अनेक निवडणुका शेकापने विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आहेत. शेकापच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने विवेक पाटील यांचा परिचय लढवय्या नेता म्हणून करून देताना जनतेचा प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. शेकापने त्यांना 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 या सहा विधानसभा निवडणुका आणि एक लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे लोकप्रतिनिधी निवडून कर्नाळा बँक, कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक राष्ट्रीय व राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वाला निरनिराळ्या कार्यक्रमांमधून बोलावून शेकापने निवडणुकांसाठी विवेक पाटील यांच्या लोकप्रियतेच्या फायदा उचलला आहे. गेल्या सहा महिन्यांत प्रामुख्याने शेकापचे कार्यकर्ते, परंपरागत मतदार, ज्येष्ठ नागरिक व शासकीय कर्मचारी यांच्या ठेवींमुळे 17 शाखांपर्यंत ज्या कर्नाळा बँकेचा विस्तार पोहचला, ती बँक बुडताना शेकापचे मौन हे आश्चर्यकारक आहे.

छोटीशी चोरी लगेच पोलीस पकडतात, मग एवढा मोठा घोटाळा झाला असताना पोलीस का गप्प आहेत, असा सवाल या वेळी पत्रकार गोपाळ शहा यांनी केला असता महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक म्हणून शेकाप असल्याने राज्य सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसून या प्रकरणात सरकारचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे आमदार महेश बालदी म्हणाले.

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी 17 फेबुवारी रोजी पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सर्व प्रमुख वाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी ही बातमी प्रसिद्ध केली. 17 फेबुवारी रोजी दाखल झालेला गुन्ह्यात विवेक पाटील, बँकेचे संचालक, संबंधित अधिकारी व कर्जदार अशा एकूण 76 पैकी किमान 20 जण शेकापचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील हे पक्षाचे सरचिटणीस आहेत, तसेच सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. आमदार बाळाराम पाटील हे विधान परिषद सदस्य असून त्यांनी रायगड जिल्हा शेकापचे चिटणीसपद (प्रमुख पद) भूषविले आहे. या व अन्य कुठल्याही नेत्यांनी विवेक पाटील यांचे ना समर्थन केले, ना त्यांचा धिक्कार केला आहे. 512.54 कोटी रुपयांचा घोटाळा उघड होतो. हजारो ठेवीदार आक्रोश करतात, पण शेकाप या विषयावर आजपर्यंत का गप्प आहे? अनेक सामाजिक विषयांवर आपल्या प्रतिक्रिया अतिआक्रमकपणे मांडणारे शेकापचे युवा कार्यकर्ते व त्यांचे नेते आपल्याच नेत्यांचा हा पराक्रम पाहून पेटून का उठत नाहीत? असे प्रश्न संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्याला पडले आहेत.

’मी माझी सगळी प्रॉपर्टी विकेन, पण ठेवीदारांचे पैसे परत देईन’ असे म्हणणार्‍या विवेक पाटलांनी स्वतःचे राहते घर मात्र फुटकळ किमतीत आपल्या मुलाच्या सासर्‍याला विकले असल्याचेही उघड झाले आहे. विवेक पाटील यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशिलातील सर्व मालमत्ता कुठल्या ना कुठल्या बँकेत गहाण आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी अथवा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. अशा स्थितीत विवेक पाटील किंवा शेकापच्या या लूटमारीमध्ये सहभागी झालेला कुणीही पदाधिकारी ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल ही आशा नाही, मात्र 61 हजार खातेदारांची लूट होत असताना निगरगट्टपणे शेकाप नवी मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याची भाषा करतोय, या प्रवृत्तीचा निषेधच केला पाहिजे.

सर्वसामान्य ठेवीदारांना लुटणार्‍या या शेकाप नेत्यांकडून कर्जखात्यातून काढलेले हे पैसे कुठे लपवले, याचे उत्तर कधी मिळणार, असा प्रश्न सगळीकडे उपस्थित होत आहे. लोकांना माहिती देण्याचे काम झाले पाहिजे, मात्र सहकार खाते, पोलीस, गृहखाते शांत बसले आहे. असे असले तरी काहीही करू, पत्रकार आणि आपण सारे मिळून ठेवीदार, खातेदारांचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करीत राहू, असेही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

’ते’ पैसे कुठे गेले?

 ’मी स्वतःची सगळी प्रॉपर्टी विकून पैसे परत देईन’ असे विवेक पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते, मात्र नवीन पनवेल येथील त्यांचा आस्वाद बंगला

स्वतःच्या सोयर्‍याला विकण्यात आला. त्याचबरोबर नेवाळी, शिरढोण, कर्नाळा, बारापाडा, साई, पनवेल, कामोठे येथील मालमत्ता कोट्यवधी रुपयांना गहाण ठेवल्या आहेत. मग त्या मालमत्तांचे पैसे गेले कुठे, हा नवा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित झाला आहे.

रायगडकरांना उत्सुकता कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे हजारो खातेदार, ठेवीदार चिंतेत अडकले असताना सहकार खाते मात्र ठेवीदार आणि खातेदारांचा अंत का पाहत आहे, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करून या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. हा विषय विधिमंडळात पर्यायाने महाराष्ट्रात गाजला. त्यामुळे येत्या काही दिवसांत तरी राज्य सरकार लक्ष देईल की नाही, याबाबत रायगडकरांना उत्सुकता लागली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply