भारतीय संघाचा सलग दुसरा विजय
मुंबई : प्रतिनिधी
अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद 57 धावांची वादळी खेळी केली.
मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी करीत 20 षटकांत 8 बाद 138 धावा केल्या. 139 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग (3),
कर्णधार सचिन तेंडुलकर (0) आणि युवराज सिंग (1) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. बांगर 18 धावांवर बाद झाले. त्यापाठोपाठ कैफ 46 धावांवर माघारी परतला.
भारतीय संघाला अखेरच्या पाच षटकांत 55 धावांची गरज होती. तेव्हा इरफान पठाणने वादळी खेळी केली. त्याने 31 चेंडूंत तीन षटकार आणि सहा चौकारांसह 57 धावा चोपल्या. इरफानने मनप्रीत गोनीसह सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागिदारी केली. यामुळे भारताने लंकेवर पाच विकेटनी विजय मिळवला. इरफान पठाणने फलंदाजीत नाबाद 57, तर गोलंदाजीत एक बळी घेतला. अष्टपैलू खेळासाठी पठाणला सामनावीर घोषित करण्यातआले.