पनवेल : प्रतिनिधी
खेळासाठी पनवेलजवळ अद्ययावत, आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार सुविधायुक्त ठिकाण असेल असे वाटले नव्हते, पण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये आल्यानंतर मी हे सगळे पाहून बेहद खुश झाले, असे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे काही चित्रिकरण आरटीआयएससीमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू होते. बुधवारी येथे चित्रिकरण संपल्यावर फुलराणी सायनाची भूमिका करणारी बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आम्ही या क्रीडा संकुलात येण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असे सांगितले. सायनासारखे खेळायचे असल्याने त्या भागांचे चित्रिकरण करण्यापूर्वी स्वतःला परिपूर्ण करायचे होते. त्याची संधी येथे मिळाली, असे परिणीतीने नमूद केले.
आपल्या अनुभवाबद्दल परिणीतीने सांगितले की, आरटीआयएससीमध्ये मला जास्त वेळ बॅडमिंटनचा सराव करायला मिळाला. येथे चोख व्यवस्था होती. या ठिकाणी मिळाणारे हायजेनिक खाद्यपदार्थ आणि येथील कर्मचार्यांची चांगली वागणूक यामुळे मला शांत झोप मिळाली. त्यामुळे मी दुसर्या दिवशी चित्रिकरणासाठी फ्रेश असायचे. त्याचा फायदा मला निश्चितच झालेला चित्रपट पाहताना दिसेल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते, संकलन दीपा भाटीया करीत असून, यात परिणीतीबरोबरच अभिनेता मानव याचीही भूमिका आहे. या सर्वांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख सोबत होते. त्या वेळी सर्व टीमने आनंद व्यक्त केला आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या एकूणच व्यवस्थेची तारीफ केली.