Breaking News

सडेतोड उत्तर

आपल्या विरोधात जाणारे मुद्दे देखील ऐकून घेण्याची क्षमता सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधकांमध्येही असावी लागते. पण काँग्रेसला त्याची सवयच नाही. याच वृत्तीमुळे देशभरात काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली आहे. निरर्थक अहंकार आणि सत्तेचा दर्प या दोन दुष्प्रवृत्तींमुळे काँग्रेससारखा पक्ष आज लयाला जाण्याची चिन्हे दाखवत आहे. दिल्लीच्या दंगलींबाबत गृहमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनासंदर्भात काँग्रेसने थोडी सहिष्णुता दाखवून किमान ऐकून घेतले असते तरी काही बिघडणार नव्हते. उलटपक्षी काँग्रेस खासदारांचे वर्तन सुधारल्याचा सुखद धक्का जनतेला बसला असता. परंतु तसे काहीही घडले नाही.

वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून पुष्ट आणि सुस्त झालेल्या काँग्रेस पक्षाला इतकी अवकळा येऊनही त्यांचा येळकोट काही केल्या जात नाही. आपण बोलतो तेच खरे आणि आपण सांगतो तीच खरी वस्तुस्थिती हा काँग्रेसचा दुराग्रह गेल्या साडेसहा वर्षांत अनेकदा दिसून आला आहे. सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षाने प्रखर टीका करणे लोकशाहीला अभिप्रेतच असते. किंबहुना, विरोधी पक्षाचे तेच काम आहे. परंतु आपली भूमिका मांडल्यानंतर अन्य दलातील कुणी वेगळा सूर लावल्यास तोही ऐकून घेण्याची तयारी असावयास हवी. परंतु आपले सोडून दुसर्‍या कुणाचे काही म्हणणे काँग्रेसला ऐकूच येत नाही. बुधवारी संसदेमध्ये याचेच प्रत्यंतर पुन्हा एकवार आले. दिल्ली येथे नुकत्याच होऊन गेलेल्या दंगलींबाबत लोकसभेत सविस्तर चर्चा व्हावी असा आग्रह काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी धरला होता. तो मान्य देखील करण्यात आला. होळीच्या उत्सवानंतर तातडीने लोकसभेत दिल्लीतील दंगलींबाबत चर्चा करण्यात येईल असे लोकसभाध्यक्षांनी जाहीर केले होते. परंतु आपला हेका न सोडता काँग्रेसने संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज होऊ दिले नाही. घोषणाबाजी करत कागदपत्रे फाडण्याचा उद्दामपणा देखील काँग्रेस खासदारांनी केला. त्या शिस्तभंगाबद्दल काही खासदारांवर निलंबनाची कारवाई देखील झाली. एवढे नाटक झाल्यानंतर होळीच्या दुसर्‍याच दिवशी दिल्ली दंगलीबाबत लोकसभेत सविस्तर चर्चा सुरू झाली. तब्बल साडेसहा तास चाललेल्या या चर्चेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी अत्यंत पोकळ आणि असत्यावर आधारित टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला. दिल्ली पोलिसांच्या वर्तनावर देखील यथेच्छ तोंडसुख घेतले. काँग्रेसच्या बेताल आणि बेफाम आरोपांसहित सारे काही शांतपणे ऐकून घेणार्‍या गृहमंत्री शहा यांनी दुपारनंतर या चर्चेला जे समर्पक उत्तर दिले त्याला संसदेच्या इतिहासात तोड नसावी. काँग्रेसच्या काळात किती आणि कुठेकुठे दंगली झाल्या? दिल्ली दंगलीत गुंतलेल्या समाजकंटकांना कोणी आणि कसे चिथावले होते. दिल्ली पोलिसांनी अवघ्या 48 तासांत दंगलग्रस्त भागांवर नियंत्रण कसे मिळवले? या सार्‍याचा तपशीलवार लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून मांडला. त्याने सारे सभागृह अवाक झाले होते. अर्थात दंगलींबाबतच्या चर्चेचा हा भाग आपल्याला चांगलाच गैरसोयीचा आहे हे न ओळखण्याइतके काँग्रेसचे खासदार दुधखुळे नाहीत. साहजिकच गृहमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी सभात्यागाचे अस्त्र उपसले. सत्ताधारी पक्षाची आणि अथक मेहनत करणार्‍या दिल्ली पोलिसांची बाजू मात्र सार्‍या देशाला कळली. नव्यानेच भारतीय जनता पक्षात आलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या शब्दात सांगायचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आपला भारत सुरक्षित आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply