अहमद पटेल यांचा खुलासा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली. बुधवारी (दि. 6) सकाळी दहाच्या सुमारास पटेल गडकरींची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले. महाराष्ट्रामधील राजकीय सत्तासंघर्षावर चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा असली तरी या भेटीचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे पटेल यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे. सोनिया गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे अहमद पटेल हे बुधवारी सकाळी गडकरींच्या भेटीला गेल्याने राज्यातील शिवसेनेची गणिते बिघडू शकतात, अशी नवी चर्चा सुरू झाली. पटेल हे सोनिया गांधींचे निकटवर्तीय असून ते सध्या काँग्रेसमधील दुसर्या क्रमांकाचे नेते आहेत. काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्याच सल्ल्याने होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा सोडवण्यासाठीच ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. मात्र आपण शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गडकरींची भेट घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. गडकरींची भेट घेतल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना पटेल यांनी भेटीमगील कारण स्पष्ट केलं. मी शेतकर्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही, असं पटेल यांनी सांगितलं. राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर शिवसेना सत्ता स्थापन करेल असा दावा केला आहे. असं असलं तरी शिवसेनेच्या सत्ता स्थापनेची मदार ही काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळेच पटेल आणि गडकरी यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारणावर मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.