Breaking News

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बसंती जैन यांचा सन्मान

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचा उपक्रम

पनवेल ः प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या बसंती जैन यांचा शनिवारी (दि. 14) पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच महिला दिनानिमित्त दरवर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत असतो. यंदाच्या वर्षी बसंती जैन यांना गौरविण्यात आले. महिला दिनाच्या औचित्याने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्याने समाजाला त्यांच्या कार्याची ओळख होते, तसेच त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवल्याने अनेक माता-भगिनींना प्रेरणा मिळते, असे विचार मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी व्यक्त केले. बसंती जैन यांनी सन्मान केल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे आभार मानले, तसेच त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने यापुढे अधिक ऊर्जेने काम करेन, अशी भावना व्यक्त केली. बसंती जैन या पार्श्व वुमन संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील गोरगरीब मुलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहेत. पनवेल स्मार्ट मम्मीज संस्थेच्या माध्यमातूनही त्या समाजकार्य करतात. काटारा महिला प्रगती संघाच्या त्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आहेत. पोलीस दक्षता समितीच्या त्या सदस्य आहेत. राजस्थान महिला मंडळ, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) अशा संस्थांतून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संतुलन, गरिबांसाठी शिक्षण, दुर्गम विभागातील गरीब जनतेच्या जीवनमानाचा स्तर वाढविणे अशा अनेक अभियानांत त्या सक्रिय आहेत. बसंती जैन यांच्या सन्मान सोहळ्याला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष माधव पाटील, माजी अध्यक्ष अविनाश कोळी, खजिनदार विवेक पाटील, माजी अध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, मंदार दोंदे, नितीन कोळी, राजू गाडे तसेच भाजपचे पनवेल शहर खजिनदार संजय जैन आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply