Breaking News

‘तो रुग्ण देखरेखीखाली होता’

पनवेल : प्रतिनिधी : कामोठे येथील कोरोनाचा पॉझिटिव्ह ठरलेला रुग्ण 12 दिवस आमच्या देखरेखीखाली होता. वीणा ट्रॅव्हलमधून सहलीला गेलेल्या ग्रुपपैकी तो होता. आम्ही त्यांना कस्तुरबामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील पती-पत्नीपैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

पनवेल महापालिका हद्दीत कामोठे येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत दिल्याने पनवेलमध्ये नागरिकांत घबराट पसरली होती, पण महापालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍याने शनिवारी रात्री पत्रकारांना माहिती दिली नाही. त्यामुळे रविवारी (दि. 15)  आयुक्तांनी महिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अधिकारी फोन घेत नसल्याबद्दल तक्रार करण्यात आली. यापुढे उपायुक्त संजय शिंदे हे पत्रकारांचे फोन घेऊन त्यांना माहिती पुरवतील, असे सांगण्यात आले. या वेळी आयुक्तांनी आपण घेतलेल्या काळजीमुळेच कोरोनाग्रस्ताच्या पत्नीला त्यांचा संसर्ग झाला नसल्याचे सांगितले.

या वेळी त्यांनी पनवेल तालुक्यातील तरुणांची क्रिकेट टीम दुबईला गेली होती. ती शनिवारी रात्री आली असून त्यातील 16  जणांपैकी नऊ जण पनवेलमधील असल्याची माहिती दिली. त्यांना विमानतळावरूनच महापालिकेने त्यांच्या गाड्या परत पाठवून महापालिकेच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. सध्या त्यांना खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवले आहे. कोरोनाचा रुग्ण 13 दिवसांनंतर पॉझिटिव्ह झाला असल्याचे लक्षात आल्याने या टीमच्या सदस्यांना आता 14 दिवस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता आणखी काही जण येणार आहेत. त्यांनाही येथे ठेवले जाणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून  शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. नागरिकांनी स्वत:च थोडीशी खबरादरी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

खारघर येथील ग्रामविकास भवनाचे कर्मचारी पळून गेले असल्याचे आयुक्तांनी मान्य करून पब्लिक सर्व्हंट म्हणून त्यांचे वागणे चुकीचे असून ही एक शोकांतिका असल्याचे सांगितले. या वेळी इंडिया बुलची इमारत महापालिका हद्दीत नसल्याने ती आपण ताब्यात घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply