पुणे ः प्रतिनिधी : झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकार्यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे 5 लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार सुनील तलवारे (28) हा वडगाव मावळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या कर्मचार्यांना मिळाली. त्यानुसार अधिकार्यांनी तातडीने जाऊन कारवाई केली असता तो राहत्या घरात पत्नी आणि मुलीसह आढळून आला. आरोपी सुनीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ येथे घरफोड्या केल्याचे समोर आले.
आरोपी सुनीलला जुळा भाऊ असून तोदेखील घरफोड्या करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुनील हा सराईत गुन्हेगार असून त्याला कमी वेळेत जास्त पैसे कमवून श्रीमंत व्हायचं होतं. यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून घरफोड्या करत आहे. त्याने आतापर्यंत तब्बल 50 घरफोड्या केल्या आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने केली.