Breaking News

कोरोनाचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी; राज्याला 15 दिवस जकिरीचे; शाळा-महाविद्यालयांसह निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई : प्रतिनिधी

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि पावले उचलण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 16) याबाबतची माहिती दिली. परिणामी राज्याच्या दृष्टीने पुढील 15 दिवस जिकिरीचे असणार आहेत.

मुंबईतील वर्षा निवासस्थानी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास सर्वोच्च प्राधान्य असून आता राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरू ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

रायगडात विदेशातून आलेले

88 जण निगराणीखाली

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात विदेशातून आलेल्या  88 जणांना  डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यापैकी एकही संशयित नाही, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकरी निधी चौधरी यांनी दिली. 13 मार्चपासून जिल्ह्यात विदेशातून येणार्‍यांची संख्या 88 इतकी आहे. त्यापैकी 47 जणांवर त्यांच्या घरी, तर 41 जणांवर स्वतंत्र कक्षात लक्ष ठेवण्यात येत आहे.

धार्मिक स्थळांवरही भाविकांना बंदी

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अष्टविनायकपैकी रायगड जिल्ह्यातील महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर ही दोन धार्मिक स्थळे तसेच इमॅजिका वॉटर पार्क आणि घारापुरी लेणी या ठिकाणी नागरिकांना 31 मार्चपर्यंत जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियमित सुरू राहणार आहेत.

रायगड जिल्ह्यात दुबई येथून आलेल्या काही जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर या दोन धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात. तेथे भाविकाना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. खालापूर येथे इमॅजिका वॉटर पार्क आणि उरण घारापुरी येथे प्रसिद्ध लेणी आहेत. या पर्यटन स्थळीही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या गर्दीच्या ठिकाणी 31 मार्चपर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे सापडलेला एक कोरोनाबाधित रुग्ण वगळत एकही संशयित रुग्ण आढळला नाही. परदेशातून आलेल्या नागरिकांना केवळ खबरदारी म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. -निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply