महाड : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोरोना व्हायरसमुळे महाडमधील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शाळा तसेच किल्ले रायगड रोप वेदेखील बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासन विविध मार्गाने जनजागृती करीत आहे. प्रशासनाकडून सातत्याने केली जाणारी जनजागृती आणि उपाययोजनांमुळेदेखील नागरिक धास्तावत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोना संशयितांसाठी कोरोनटाईन सेंटर सुरू केले आहे. डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 10 खाटांच्या या सेंटरमध्ये बाहेरून येणार्या नागरिकांमधील संशयित रुग्णांची तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ मुंबई किंवा पुणे येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. सदर सेंटर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू करण्यात येणार होते, मात्र तेथील ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शवल्यामुळे हे सेंटर आता राष्ट्रीय स्मारकात सुरू करण्यात आले आहे.
या कोरोनटाईन सेंटरमध्ये देशात आणि देशाबाहेर फिरण्यास गेलेल्या चार जणांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास नसला तरी खबरदारी म्हणून पुढील काही दिवस येथे ठेवले जाणार आहे, अशी माहिती डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.