Breaking News

मागूर माशांच्या साठ्यावर कारवाई

अलिबाग : जिमाका

राष्ट्रीय हरीत लवादाने प्रतिबंधित केलेल्या मागूर माशाचा साठा केल्याप्रकरणी मत्स्यव्यवसाय विभाग रायगड जिल्हा सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाने कारवाई केली आहे. या अंतर्गत खालापूर तालुक्यात दोन ठिकाणचा साठा पथकाने नष्ट केला, तर पनवेल तालुक्यात नऊ जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

खालापूर तालुक्यातील महड गावात एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावात प्रतिबंधित मागूर मत्स्यसाठा आढळला. या मत्स्यसंवर्धकाला यापूर्वी नोटीस देऊनदेखील त्याने मत्स्यसाठा नष्ट केला नव्हता. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने मत्स्यसंवर्धन तळ्यांच्या बाजूला खड्डा खणून अंदाजे मागूर जातीची तीन हजार किलो मासळी खड्ड्यात टाकून ती नष्ट केली, तर माजगाव येथील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावावर अशाच प्रकारे मागूर माशांचा मत्स्यसाठा आढळला. हा अंदाजे 1500 ते 1700 किलो मत्स्यसाठाही नष्ट

करण्यात आला.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने पनवेल तालुक्यातील मासळी विक्री केंद्रांना भेट दिल असता, तळोजा येथील आठ व कामोठे येथील एक मत्स्यविक्रेता मागूर माशांची विक्री करताना आढळले. या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून, या माशांची यापुढे विक्री करू नये, अशी समज देण्यात आली. राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशान्वये विदेशी मागूर माशांचे संवर्धन व विक्री करण्यास बंदी असून, कोणीही या माशांचे संवर्धन करू नये, असे मत्स्यव्यवसाय खात्याचे रायगड विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी आवाहन केले आहे. प्रतिबंधित मागूर माशांचे संवर्धन अथवा विक्री करताना कोणी आढळल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयास 02141-224221 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply