Breaking News

आता तरी कामाला लागा!

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

मुंबई ः प्रतिनिधी

सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारण्यातच वाया घालवणार्‍या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आता तरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (दि. 28) केला. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता त्रस्त झाल्याने कामाला लागा, समस्या सोडवा असेही उपाध्ये म्हणाले. भाजनपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, एसटी संप, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. गेल्या अडीच वर्षांत नाकर्त्या सरकारमुळे महाराष्ट्रातील विकासाची कामे ठप्प झाली. खंडणीवसुली, खून, बलात्कार, भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट मंत्रालयात घुसली. मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्याने या कोंबडीला कसे लुटले ते जाधव यांच्या पराक्रमातून जनतेसमोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्यातील यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना हाताशी थरून याच मुंबईतून कोट्यवधींची माया गोळा केली. मातोश्रींना दोन कोटींची रोकड आणि 50 लाखांचे महागडे घड्याळ भेट देणार्‍या जाधवांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का? असा सवालही उपाध्ये यांनी केला. या प्रकरणातील यशवंत जाधव यांच्या कथित मातोश्रीचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील प्रश्न जैसे थे

गेल्या अडीच वर्षांत राज्यात भ्रष्टाचार, गुंडगिरी, बोकाळली. महिलांवरील अत्याचार वाढले. सामान्य कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली, शेतकर्‍यांना नैराश्य आले, आत्महत्या वाढल्या. अशा भीषण परिस्थितीत मुख्यमंत्री मात्र समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहेत, असा आरोप उपाध्ये यांनी केला. आज बाळासाहेब असते, तर त्यांनीही दोन वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता कामाला लागा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता, असेही उपाध्ये म्हणाले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply