Breaking News

पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेसपुढे हतबल

यशोमती ठाकूर प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : प्रतिनिधी
कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते, पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे, मात्र मुख्यमंत्री या विषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पाटील पुढे ते म्हणाले की, वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे. तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पक्ष निषेध करतो.
एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणार्‍या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावती न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी 15 हजार 500 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मारहाणीची ही घटना 24 मार्च 2012 रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. या प्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply