मुंबई : प्रतिनिधी
कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएलचा 13वा हंगाम 29 ते 15 एप्रिलपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल स्पर्धा नेमकी कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. यासंदर्भात नुकतीच आयपीएलमधील संघांच्या मालकांशी आणि बीसीसीआयच्या अधिकार्यांशी बैठक झाली. या बैठकीत अन्य पर्याय कोणते आहेत यावर चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी आयपीएल स्पर्धा पूर्ण घेण्यावरच फोकस आहे. याचा अर्थ 60 सामने होतील. स्पर्धा भारतात झाली नाही तर बाहेरच्या देशात पण पूर्ण आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार केला जात आहे. आयसीसीच्या नियोजनानुसार जुलै आणि सप्टेंबर महिन्यात जागतिक क्रिकेट बर्यापैकी मोकळे असेल. त्यामुळे या काळात आयपीएल स्पर्धा होऊ शकते. आशिया कप टी-20 चे आयोजन युएईमध्ये होणार आहे, तर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान वगळता ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ अधिक व्यस्त नाहीत.
भारतीय क्रिकेट संघ आशिया कप वगळता ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 वर्ल्ड कपच्या आधी श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या दृष्टीने जागतीक क्रिकेटमधील कार्यक्रम पाहता आयपीएल जुलै-सप्टेंबर या काळात घेतली जाऊ शकते. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 37 दिवस आयपीएल स्पर्धा घेण्यात आली होती. त्या वेळी पाच आठवडे आणि दोन दिवसात ही स्पर्धा पूर्ण झाली. त्यामुळे काही सामने भारतात आणि काही सामने परदेशात होऊ शकतात. जर भारतात शक्य झाले नाही, तर संपूर्ण स्पर्धा अन्य देशात होऊ शकते. अर्थात, तेव्हादेखील करोना व्हायरसची परिस्थिती कशी असेल त्यावरच सर्व काही अवलंबून असेल.