पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभाही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आली होती. ही सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापौरांच्या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सभेची तारीख नंतर कळविण्यात येईल, असे पनवेल महानगरपालिका सचिव तिलकराज खापर्डे यांनी कळविले आहे.