नवी मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदी शिथिलीकरणानुसार सोमवारपासून नवी मुंबईतील उपाहारगृहे, मद्यालये खुली करण्यात आली असून पहिल्याच दिवशी कुठेही ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. ही परिस्थिती हळूहळू ठीक होईल, असा आशावाद मात्र उपाहारगृह मालकांनी व्यक्त केला आहे, तर रात्री 7 वाजेपर्यंतच मद्यालये खुली राहणार असल्याची अट घालण्यात आल्याने याबाबत मद्यालय चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसर्या टप्प्यात उपाहारगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली होती, मात्र केवळ पार्सल सेवा सुरू होती. आता ही उपाहारगृहे पहिल्यासारखी खुली झाली आहेत. यात सामाजिक अंतर पाळणे, हात धुण्यासाठी सोय, प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण फवारणी, तापमापी ठेवणे आदी अटी घातल्या आहेत. सामाजिक अंतराची अट पाळली जावी म्हणून उपाहारगृह किंवा बारच्या क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश मिळणार आहे.
या सर्व अटींसह सोमवारपासून नवी मुंबईतील उपाहारगृहे व मद्यालये सुरू झाली आहेत, मात्र आचारी वा अन्य कामगारवर्ग अजूनही परतला नसल्याने काहींनी आपले व्यवसाय सुरू केले नाहीत. ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून उर्वरित उपाहारागृहे सुरू करण्यात येणार आहेत. नवी मुंबईत सुमारे 650पेक्षा अधिक उपाहारागृहे, तर 400च्या आसपास मद्यालये आहेत. या ठिकाणी पार्सल सेवा सुरू आहे, मात्र ती पूर्ण क्षमतेने खुली करण्याबाबत मालक अजूनही साशंक दिसत आहेत.