Breaking News

कोरोनाचा असाही धसका… पोलादपूरमध्ये विदेशी पर्यटक कुटुंबावरून उडाला गोंधळ

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची अतिसतर्कता वाढीस लागल्याने मंगळवारी (दि. 17) सायंकाळी एका व्हॅनिटी व्हॅनमधून माटवण येथील स्मशानभूमीजवळ आलेल्या विदेशी पर्यटक कुटुंबाला चक्क शेकडो लोकांचा गराडा पडला आणि या घटनेनंतर त्या कुटुंबाची सरकारी यंत्रणेकडून कसून चौकशी करण्यात आली, मात्र हे कुटुंब स्पेन देशातून कोरोना विषाणू फैलावाच्या आधीपासूनच भारतात असल्याने बाधित अथवा संशयित नसल्याने संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा

निःश्वास सोडला, पण या प्रकारात किमान तीन तास ग्रामस्थांचा गोंधळ आणि यंत्रणेची धावपळ सुरू होती.

मुंबई-गोवा असा प्रवास करण्यासाठी सर्व सोयींनी सुसज्ज व्हॅनिटी व्हॅनमधून निघालेले विदेशी पर्यटक जोडपे आणि त्यांचा एक मुलगा मंगळवारी संध्याकाळी रस्ता चुकले आणि राजेवाडी भोराव फाट्यापासून थेट हावरे या अतिदुर्गम खेडेगावाकडे गेले, मात्र सोशल मीडियावरून ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची अतिसतर्कता निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना तेथून पिटाळून लावले. तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत बोलणार्‍या ग्रामीण भागातील काही सुशिक्षितांना या पर्यटकांच्या स्पॅनिश भाषेमुळे पर्यटकांची नेमकी अडचण समजेनाशी झाली. यानंतर या पर्यटकांची माहिती पोलादपूर येथे प्रशासनाला देण्यात आली.

याबाबतचे वृत्त कळताच पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाब सोनावणे आणि डॉ. राजेश शिंदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक लोणे यांनी माटवणच्या दिशेने धाव घेतली. या वेळी रस्त्यालगत नदीपात्रातील कातळाजवळ स्पॅनिश कुटुंब स्वयंपाक करीत निवांत बसल्याचे दिसून आले. अधिक चौकशी करता हे कुटुंब स्पेनमधूून 8 फेब्रुवारीला भारतात पर्यटनासाठी आल्याचे स्पष्ट झाले.

परदेशी पर्यटक कोरोना विषाणू फैलावाच्या आधीपासूनच भारतात पर्यटन करीत असल्याने त्यांना कोरोना संसर्ग झाला असण्याची तसेच त्यांच्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नसल्याचे सकृतदर्शनी निश्चित झाले. पीएसआय लोणे यांनी या कुटुंबाचे पासपोर्ट व व्हिसा आदी कागदपत्रे तपासून पाहिली आणि डॉ. सोनावणे तसेच डॉ. शिंदे यांनी त्यांची आरोग्य तपासणीही केली. यानंतर पोलिसांनी त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी वास्तव्यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्याच्या मागील नदीपात्रालगत येण्यास अथवा सरकारी विश्रामगृहात वस्ती करण्यास सांगितले असता या कुटुंबाने पर्यटनासाठी आल्याचे सांगून नकार दिला.

दरम्यान, मंगळवारी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले पुणे येथे वास्तव्यास असलेले अन्य एक कुटुंब सवाद परिसरात आल्याचे समजून आल्याने आरोग्य तपासणीस गेलेल्या सरकारी यंत्रणेला ग्रामस्थांकडून अतिसतर्कतेमुळे आक्रमक प्रश्नांची सरबराई झाल्याची माहिती मिळाली. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात परदेशातून तसेच शहरी भागातून आलेल्या चाकरमानी पाहुण्यांसह कोरोनाबाधितांना शासकीय पाहुणचार व उपचार देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. त्यांना विश्रामगृहात स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आले.

स्वच्छतेला प्राधान्य

या कुटुंबाने बुधवारी सकाळी उठल्यानंतर रात्री जिथे स्वयंपाक केला, त्या नदीच्या कातळावरील स्वच्छता केली व ते गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावरून हे परदेशी कुटुंब स्वच्छतेविषयी जागरूक असल्याचे दिसले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply