पनवेल : प्रतिनिधी
एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा होत असताना आता कोरोनामुळे प्रवाशी संख्या कमी झाल्याने महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या अनेक सेवांमध्ये ठेकेदारी आणली त्याचे परिणाम आज तोटा वाढण्यास कारणीभूत ठरत आसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्यांच्या चुकीचा फटका एसटीला आणि अधिकार्यांना बसत आहे. त्यामुळे अधिकारी भीतीच्या छायेत वावरत आहेत माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत महामंडळात जास्तीत जास्त सेवा ठेकेदारांमार्फत घेण्यास सुरुवात केली. आगारातील स्वच्छता करण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्याकडे कामगार नसल्याने आगारा आणि स्थानकांवरील स्वच्छता होत नव्हती. पण लाखो रुपयांची बिले घेतली जात होती. शिवशाही गाड्या भाड्याने घेतल्या या गाड्यांचे चालक प्रशिक्षित नसल्याने अनेक अपघात झाले. त्यामुळे जखमी आणि मृत प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागली त्यामूळे एसटीचे आर्थिक नुकसान झाले. एसटीच्या टोल फ्री हेल्प लाईनवर फोन केल्यावर महामंडळाचे कर्मचारी या क्रमांकावर माहिती देण्याचे आणि तक्रार घेऊन सोडवण्याचे काम करायचे. आता टोल फ्री हेल्प लाईनसाठी ही ठेकेदारची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीच्या कर्मचार्यांना तक्रार कशी सोडवायची याची माहिती नाही. त्यांना आगार प्रमुखांचे ही फोन क्रमांक दिले आहेत. त्यामुळे ज्या तक्रारी वाहतूक नियंत्रकाच्या पातळीवर सोडवता येतात. त्यासाठी हे कर्मचारी आगार प्रमुखांना फोन लावतात. आगार प्रमुखांनी 24 तासात कधीही ठराविक सेकंदात फोन न उचलल्यास वरिष्ठ अधिकार्यांना फोन केला जातो. त्यांनी न उचलल्यास त्यांच्या वरिष्ठांना फोन केला जातो. मग वरिष्ठांकडून या अधिकार्यांना जाब विचारला जातो. त्यामुळे हेल्प लाईनच्या ठेकेदाराची दहशत मात्र त्यांच्यात दिसत आहे.