जावेद मियाँदाद यांचा घरचा आहेर
कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट संघातील एकाही खेळाडूची भारतीय संघातून खेळण्याची लायकी नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला. खराब कामगिरी करणार्या खेळाडूंना वारंवार संधी दिल्याचा आरोप मियाँदाद यांनी बोर्डावर केला.
पाकिस्तान संघात असा एक तरी खेळाडू आहे का जो भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडसारख्या संघातील खेळाडूला बदली म्हणून खेळू शकेल, या प्रश्नाचे उत्तर नाहीच असे आहे. पाकिस्तान संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, पण एकही चांगला फलंदाज नसल्याचे त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मियाँदाद यांनी सांगितले की, पाकिस्तान जगातील असा एकमेव संघ आहे जो खेळाडूंना जुन्या कामगिरीच्या आधारावर संघात स्थान देतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलियात प्रत्येक मालिकेतील कामगिरीच्या आधारावर संघाची निवड केली जाते. पाकिस्तान संघात एक शतक केल्यास पुढील 10 सामने संघात स्थान मिळते. पाकिस्तान संघाचा हा मुख्य प्रश्न आहे.
भारतासारख्या संघातील खेळाडू 70, 80, 100 किंवा 200 धावा करतात. ही खरी कामगिरी आहे, पण पाकिस्तान संघातील एकही खेळाडू टॉपचा फलंदाज नसल्याचे ते म्हणाले. फलंदाजांना जबाबदार खेळ करण्यासाठी मियाँदाद यांनी अनोखा उपाय सुचवला. फलंदाजाला तेव्हाच पैसे मिळतील जेव्हा तो चांगली धावसंख्या करेल, असेही मियाँदाद यांनी सुचवले आहे.