पनवेल : कोरोनाविरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वांनी मनात भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
चीनमधून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि अनेक देशांत तो पसरला. आपला देशही त्याला अपवाद नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे नागरिकांना सजग केले जात आहे, तसेच त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांचादेखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तथापि आता 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचे पालन करतानाच सुटीचा दिवस म्हणून अकारण गर्दी वाढू नये यासाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला प्रतिसाद मिळावा यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तीगत पातळीवर त्याचे समर्थन करण्यात आले आहे.
काही नागरिकांनी तर सोशल मीडियावर समर्थन करताना मी शपथ घेतो की, असे नमूद करून मी व माझे कुटुंबीय रविवारी (दि. 22) 14 तास जनता कर्फ्यूचे पालन करेल, असे म्हटले आहे. जनता कर्फ्यू पाळतानाच सायंकाळी 5 वाजता आपल्यावर आलेल्या संकटात मदत करणार्या आरोग्य विभाग, पोलीस तसेच सरकारी अधिकारी-कर्मचारी त्याचबरोबर यामध्ये योगदान देणार्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या दरवाजात, बाल्कनीत किंवा गॅलरीमध्ये उभे राहून टाळ्या, ताट किंवा एखादे वाद्य वाजवून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असताना एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी बजावली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …