नागोठणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठ शनिवारी (दि. 21) दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांनी सांगितले. यात मेडिकल तसेच दूध आणि किराणा विक्री करणार्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सर्व किराणा दुकाने रोजच्या रोज न उघडता साखळी पद्धतीने उघडली जातील, असे संघटनेचे पदाधिकारी दिनेश परमार, अनिल काळे, दिलीप शहासने यांनी स्पष्ट केले. 31 मार्चपर्यंत इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
कर्जतमध्ये परदेशातून येणार्यांवर देखरेख; आरोग्य विभाग दक्ष
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले नसले तरी परदेश दौरा करून आलेल्या आणखी पाच जणांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली आहे. कर्जत तालुक्याचा मुख्य निगराणी कक्ष असलेल्या जीवन विद्या मिशनमधील निगराणी कक्षात त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. नेरळ येथील रहिवासी असलेले परंतु नेपाळ तसेच दुबई येथून आलेल्या पाच जणांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 20) नेरळ खांडा भागातील अमेरिकेतून आलेल्या तरुणाला जीवन विद्या मिशनमध्ये पाठवले आणि सायंकाळी नेरळ गावातील कुंभारआळी भागातील 35 वर्षीय महिला आपल्या दोन मुलांना घेऊन नेपाळ येथून आल्या आहेत, अशी माहिती पुढे आली. 20 मार्च रोजी त्या नेपाळ येथून नेरळ येथे पोहचल्या होत्या. त्यांनी नेपाळ ते नेरळ हा प्रवास ट्रेनमधून केल्याने त्यांची तपासणी झाली नव्हती. परिणामी अमेरिकेतून आलेल्या तरुणासारखे त्या तिघांच्या हातावर कोणत्याही प्रकारचे निशाण नसल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांची परदेशातून आले आहेत अशी माहिती मिळताच आरोग्य पथक नेरळ ग्रामपंचायत कर्मचार्यांसह तेथे पोहचले. सायंकाळी आरोग्य पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांना खोकला किंवा अन्य त्रास जाणवत नसल्याचे लक्षात आले. नेपाळ येथून आलेल्या तिघांची तपासणी होत असताना नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा, स्थानिक सदस्य राजेंद्र लोभी, सदस्य प्रथमेश मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते प्रभाकर देशमुख, मनोज मानकामे हे आवर्जून उपस्थित होते, मात्र त्या तिघांना कोणताही त्रास जाणवत नसल्याने आरोग्य पथकाने त्यांना घरातच आराम करण्यास सांगितले. तिघे नेरळ गावात फिरताना दिसल्यास त्यांना निगराणी कक्षात नेले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत तालुका प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क असल्याने नव्याने परदेशातून येणार्या प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे, असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
आज कर्जतची बाजारपेठ बंद
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कर्जत बाजारपेठ शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय कर्जत-दहिवली व्यापारी फेडरेशनने घेतला आहे, तर नेरळ येथील बाजारपेठ रविवारी बंदमध्ये सहभाग घेणार असून अन्य काही निर्णय सोमवारी घेणार आहेत. कोरोना विषाणूची बाधा झालेला कर्जत तालुक्यात कोणताही रुग्ण नाही, मात्र आरोग्य विभागाकडून उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात कर्जतमधील 16 रुग्ण निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 19) नेरळ व्यापारी फेडरेशनने कार्यकारिणीची बैठक घेऊन त्यात रविवार (दि. 22) च्या बंदमध्ये 100 टक्के सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गावातील राजमाता जिजामाता तलाव बंद करण्याची तसेच चिकन मांस-मच्छी यांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन व्यापारी फेडरेशनच्या वतीने नेरळ ग्रामपंचायतीला देण्यात आले असून आजपासून जिजामाता तलावाच्या गेटला टाळे लावण्यात येत असल्याचे सरपंच रावजी शिंगवा यांनी जाहीर केले आहे. कर्जत-दहिवली व्यापारी फेडरेशनच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत 21 आणि 22 मार्च रोजी कर्जत-दहिवली येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी यांनी केले आहे.
पेणमध्ये जंतुनाशकांची फवारणी
पेण : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पेण नगर परिषदेचे सफाई कामगार रोज सकाळ-संध्याकाळ शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जंतुनाशकांची फवारणी करीत आहेत. दरम्यान, नगर परिषेदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी 600 लिटर क्षमतेची स्प्रेपंपाची मागणी केली असून, शनिवार (दि. 21) पर्यंत हा स्प्रेपंप नगरपालिकेच्या आरोग्य विभागात दाखल होणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण यांनी दिली. पेण नगरपालिकेने शासनाच्या आदेशाप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. गर्दी रोखण्यासाठी नगरपालिकेने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता पेण शहरातील इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.