नवी मुंबई : बातमीदार
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अख्खा देशच लॉकडाऊन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले आवाहन राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सर्वांनीच पाळले. यात आधुनिकतेचा साज चढवलेली नवी मुंबई देखील मागे राहिली नाही. नवी मुंबईतील नागरिकांनी देखील 100 टक्के यशस्वी बंद पाळून राष्ट्रीय आपत्तीला लढण्यास आम्ही खंबीर व सक्षम आहोत हे दाखवून दिले. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच हे आधुनिक शहरात स्तब्धता, शांतता, स्वछता नि शुकशुकाट पाहण्यास मिळाला. त्यामुळे धर्माला आड न आणता राष्ट्रीय हितच महत्वाचे असल्याचे नवी मुंबईकरांनी दाखवून दिले. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार मुंबईची जुळी बहीण व तितकेच गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई शहर चिडीचूप झालेले पाहायला मिळाले. दररोज एक लाख लोकांना रोजगार देणारे आशियातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणजे एपीएमसी मार्केट कडकडीत बंद होते. वृत्तपत्र विक्रेत्यांनी देखील वृत्तपत्र कंपन्यांना पत्र पाठवून वर्तमानपत्रे न पाठवण्याची मागणी करून कर्फ्युचा आदर राखत घरात बसणे पसंत केले.