
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकाहद्दीत रविवारी जनता कर्फ्यूला चांगला पाठिंबा मिळाला. पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुसंख्य नागरिकांनी घरातच बसून राहणे पसंद केले. पण अनेकांनी कर्फ्यू असताना सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे पसंद करून कोरोनाबाबत जागरूक नसल्याचे दाखवून दिले. कोरोनापासून बचावास आपली सज्जता दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. जनतेने रस्त्यावर न येता घरात बसून राहणे ही जनता कर्फ्यूची संकल्पना होती. बहुसंख्य पनवेलकरांनी या कर्फ्यूला पाठिंबा दिला. खारघरमध्ये तर अनेक हौसिंग सोसायटीमध्ये गेटला कुलूप लावून ठेवले होते. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणालाही बाहेर जाऊ दिले जात नव्हते, आत घेतले जात नव्हते. त्यामुळे खारघरमध्ये रस्त्यावर आणि उत्सव चौकातही शुकशुकाट दिसत होता. पनवेल शहरात रविवारी सकाळी दूध, वर्तमानपत्रेही आली नाहीत. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली येथेही रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. काही ठिकाणी तरुण रस्त्यावर दुचाकीवरून फिरण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र चौकात पोलीस रस्त्यावर येणार्या प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच जाऊ देत होते. रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करणार्यांना हाकलून लावत होते. पनवेल एसटी स्थानकात शुकशुकाट होता. रेल्वे स्थानकावर येणार्यांचे ओळखपत्र तपासून त्याला फलाटावर प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फलाटावर त्यांच्या नावाची नोंद रजिस्टरमध्ये महसूल कर्मचार्यांनी केल्यावर आरोग्य कर्मचारी त्यांची तपासणी करून मगच त्यांना फलाटावर जाऊ देण्यात येत होते. दुपारी 1 वाजेपर्यंत 450 पेक्षा जास्त प्रवाशांनी लोकलने प्रवास केल्याची माहिती मिळाली. खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात अनेक सुशिक्षितांनी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावल्याची माहिती पोलीस कर्मचार्यांनी दिली. नवीन पनवेलमध्ये उद्यान बंद असल्याने सकाळी महिला आणि पुरुष रस्त्यावर मॉर्निंग वॉक करताना दिसले.
थाळी नादला प्रतिसाद

संध्याकाळी 5 वाजता अनेक लहान-मोठ्यांनी आपल्या घराच्या दारात, खिडकीत उभे राहून थाळी नाद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.