Breaking News

तुर्भे नाका येथे 22 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

पनवेल : बातमीदार

ओरिसा येथून तुर्भे नाका येथे गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दुकलीला अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने सापळा लावून अटक केली. चिन्मय विभुती सहाणी (24) व दीप गिरीश भानुशाली (21) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे असलेला पाच लाख 33 हजार रुपये किमतीचा सुमारे 22 किलो गांजा जप्त केला आहे. तुर्भे नाका भागात दोन व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या अधिपत्याखालील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तुर्भे नाका परिसरात सापळा लावला होता. या वेळी तुर्भे नाका येथील राज हॉटेजवळ चिन्मय सहाणी व दीप भानुशाली हे दोघे संशयास्पदरित्या आले असता, त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, चिन्मय सहाणीजवळ असलेल्या बॅगेमध्ये 11 किलो 782 ग्रॅम तर दीप भानुशाली याच्याजवळ असलेल्या बॅगेमध्ये 10 किलो 120 ग्रॅम गांजा आढळून आला. त्यामुळे विशेष पथकाने दोघांना अटक करून त्यांच्याजवळ असलेला पाच लाख 33 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी ओरिसा येथील असून त्यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा कुणाला विक्री करण्यासाठी आणला होता, याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे देवडे यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply