पनवेल : बातमीदार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरी काम करण्याची मुभा (वर्क फ्रॉम होम) दिली आहे. त्यामुळे देशात इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला आहे. सर्वसाधारणपणे एखादा ग्राहक दिवसाला एक किंवा दोन गिगाबाइटचा वापर करीत असतो, मात्र आता हा वापर पाच ते सहा गिगाबाइट इतका झाला आहे. डोंगल वापरासाठीही जास्त दर द्यावे लागत आहेत. देशात सध्या आयडिया, व्होडाफोन, एअरटेल आणि जिओ या तीन बड्या कंपन्या इंटरनेट सुविधा पुरवतात. तर देशात एकूण साडेसहा कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कार्यालये असून, रिलायन्स समूहाचे जीओचे टेलिकॉम मुख्यालय घणसोली येथे आहे. ऐरोली येथील माइन्ड स्पेस इमारतीत कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळल्याने ही इमारत सध्या बंद ठेवण्यात आली आहे. नवी मुंबई एमआयडीसीत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये असून, ‘वर्क फ्रोम होम’ची मुभा संगणक प्रणालीवर काम करणार्या कर्मचार्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्यांनी घरीच कार्यालये थाटली आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला असल्याची माहिती ऐरोली येथील अॅम्बिशनचे संचालक के. डी. गुप्ता यांनी दिली.