पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वत्र येत्या शनिवारी (दि. 24) दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी एकीकडे गोविंदा पथके थर लावण्याच्या तयारीला लागले आहेत; तर दुसरीकडे ज्या हंड्या फोडण्यासाठी थर लावले जातात. त्या हंड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी विविध प्रकारच्या आकर्षक हंड्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.
सर्वत्र मोठ्या उत्साहात साजर्या होणार्या दहीहंडी सणाचे सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे उंचच उंच बांधलेली हंडी आणि ही हंडी फोडण्यासाठी लावण्यात आलेले थर. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या याच हंड्या आता बाजारात दाखल झाल्या आहेत. या हंड्या विविध रंगांनी रंगवण्यात आल्या आहेत.
पथकांच्या आयोजकांबरोबरच घरोघरी देखील या हंड्यांना मोठी मागणी वाढली आहे. पूर्वी हंडीला फक्त सफेद रंग लावला जायचा, मात्र आता या हंड्या विविध रंगात रंगवल्या जात असून, त्यांना विविध प्रकारे सजवले जात आहे. बाजारात सर्वसाधारण हंडीची किंमत 150, लहान हंडीची किंमत 100 रुपयांपर्यंत आहे; तसेच सजावट न केलेल्या हंडीची किंमत 60 रुपयांपर्यंत आहे.