पनवेल : वार्ताहर
सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोक जीव मुठीत घेऊन एकएक दिवस जगत असताना चोरट्यांना या विषाणूचे गांभीर्य नसल्याने ते बंद असलेली घरे, दुचाकी किंवा चारचाकी वाहने त्याचप्रमाणे हातसफाईने मोबाइल व रोखरक्कम पळविण्याचे प्रकार सध्या कामोठे वसाहतीत सुरू झाले आहेत. कामोठे वसाहतीमध्ये सध्या दोन रहिवासीयांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या कामोठे वसाहत कोरोनाच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे, राज्य सरकार कडून संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश जाहीर करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन करणार्या रहिवासीयांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर अनावश्यक फिरणार्या नागरिकांना देखील पोलीस चोप देत आहे. त्यामुळे सर्व रहिवाशी लॉकडाऊनमध्ये घरात बसत आहे. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. रस्ते आणि सोसायटी परिसर निर्मनुष्य असल्यामुळे, चोरट्यांना चोरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याच संधीचा फायदा उठवून कामोठे वसाहतीमधील सेक्टर-19 मध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री या चोरट्याने चार सोसायट्यांमध्ये शिरून हजारो रुपयांचा ऐवज चोरला आहे. या चोरीमध्ये चोरट्याने मोबाइल फोन आणि काही रोख रक्कम लंपास केली आहे. हा सर्व प्रकार सोसायटीमधील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर समोर आला आहे. कोमल सोसायटी, कावेरी सोसायटी, राज गॅलेक्सी आणि निधी सोसायटी यामध्ये ही चोरी झाली आहे. त्यापैकी कावेरी सोसायटीमधून 19 मार्चला सायकल गेली असून 25 मार्चला नीलकंठ विल्हामधून काम करणारे मजुर यांच्याकडे असलेले तीन मोबाइल आणि काही रोखरक्कम गेली आहे. या चोरीच्या घटनेमुळे कामोठे वसाहतीमध्ये कोरोनासोबत चोरट्याची भीती वाढली आहे.