समाजकार्याचा वेगळा आदर्श
कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संचारबंदी असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. त्यांना अनेक हात भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या कार्याला मदत करीत आहेत. त्यात गरीब लोकांना बेबीताई दगडे या जेवणाची थाळी पुढे करीत आहेत, तर पोलीस दलाला डिकसळ येथील सागर शेळके आणि नेरळ येथील निकेश म्हसे हे भोजन-नाश्त्याची सोय करीत आहेत. कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे देशव्यापी जनता कर्फ्यू पाळण्यात आला, तर आता महाराष्ट्रात संचारबंदीबरोबरच जनजीवन लॉकडाऊन करण्याचे आदेश आहेत. पोलीस यंत्रणादेखील 144 कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहे. कामगार-कर्मचारीवर्गदेखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत, मात्र कर्जत तालुका हा बहुसंख्य आदिवासी भाग आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोलमजुरी केल्यावर किंवा लाकूडफाटा, रानमेवा विकून हातावर मिळणार्या रोजगारातून कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्याचा आदिवासी बांधवांचा वर्षेनुवर्षे दिनक्रम आहे. असे असताना या जीवनाला अचानक कलाटणी मिळाल्याने गाठीशी काहीच पैसे शिल्लक नसल्याने कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी व कोठून शरीरात येणार, याच विवंचनेत हा वर्ग आहे. अशा वेळी बेबीताईसारखी माणसे त्यांच्या मदतीला धावून येताना दिसत आहेत. बेबी दगडे यांच्यासारख्या माऊलीने आदिवासी व गरीब वर्गाची पोटाची खळगी भरण्यासाठी मोफत जेवणाची सेवा सुरू केली आहे. आदिवासी बांधवांना जेवणाची सोय करणार्या बेबी दगडे यांचे कार्य अनमोल आहे. शासनाचे कोरोनाबाबत नियम पाळत रोज काही आदिवासी बांधव- महिला वर्ग, त्यांची लहान मुले, गरीब, अनाथ, भिकारी जेवून जात आहेत.त्यांना दोन वेळचे जेवण 23 मार्चपासून त्यांनी अविरत सुरू केले आहे.कर्जत तालुक्यातील पोलीस यंत्रणेला काही हॉटेल व्यावसायिक मदत करीत आहेत. त्यात डिकसळ येथे असलेले आपले हॉटेल ग्राहकांसाठी बंद आहे, पण संचारबंदी सुरू झाल्यापासून नेरळ पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांना सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण पाठवले जात आहे, तर येथील निकेश म्हसे यांचे आनंदी फार्म बंद आहे, पण त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे.