Breaking News

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान

माथेरान, नेरळ परिसर जलमय

कर्जत : बातमीदार

गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसान नाही, मात्र नेरळ आणि माथेरान परिसर जलमय झाला.दरम्यान,नेरळ गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसले असून या पावसाने अनेकांच्या घरातील किमती साहित्याचे नुकसान केले आहे.

वेधशाळेने दिलेल्या इशार्‍यानुसार पाऊस पडत असून 20 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेती पावसाने भरून वाहत असली तरी या पावसामुळे कोणाचे नुकसान झालेले नाही. या पावसाने भातपिके आणखी जोमाने उभारी घेतील अशी आशा शेतकरी वर्गाला आहे. मात्र माथेरानच्या डोंगरात पडणार्‍या पावसाने पायथ्याशी असलेली दोन्ही धरणे भरून वाहत आहेत.

 कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला आहे. तर खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाचे दरवाजे यावर्षी दुसर्‍यांदा उघडण्याची वेळ आली आहे. माथेरानच्या डोंगरातील पावसाचे पाणी नेरळ भागातून उल्हास नदीला मिळते. ते पाणी नेरळ गावसाठी धोकादायक बनले आहे. पायरमाल भागातून येणार्‍या नाल्याचे पाणी खांडा येथे कर्जत-कल्याण रस्त्यावरील पुलावरून तसेच रेल्वे स्टेशनजवळ असलेला लहान पुलावरून पावसाचे पाणी जात होते. या भागातील राही हॉटेल परिसर पुन्हा जलमय झाला होता. या पावसाचे पाणी तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, औटी यांच्या घरात दीड फूट पाणी भरले होते.

माथेरानच्या डोंगरातील पाणी ज्या मातोश्री नगर भागातील नाल्यातून नेरळ एसटी स्टँड भागात येते, तेथील परिसर दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जलमय झाला होता. मातोश्री नगरमधील डॉ. सागर काटे यांच्यासह 12 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मातोश्री नगरचा कळंब रोडला जोडणारा रस्तादेखील जलमय झाला असून, रॅपिड रेसिडेन्सीमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. निर्माण नगरी भागात पुन्हा एकदा पाणी थांबून राहिले होते, तर नेरळ एसटी स्टँडमध्ये दीड फूट पाणी साचले होते.

बुधवारी संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला असून सखल भागात साचलेले पाणी ओसरले असल्याची माहिती नेरळ ग्रामपंचायत आणि महसूल विभागाकडून देण्यात आली.

जनजीवन विस्कळीत

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने सलग चार दिवस जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विशेषत: नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माणगाव तालुक्यात सोमवार सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. ही संततधार बुधवारीही सुरूच सुरु होती. पावसाच्या सरीवर सरी पडत राहिल्याने नागरिकांच्या कामांत व्यत्यय आला.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने नदी व समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

खालापुरातील बळीराजा चिंताग्रस्त

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

गणपती विसर्जनानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परतीच्या पावसाने खालापूर तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकडे पाणीचं पाणी  पाहावयास मिळत आहे. मात्र भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे तयार होत असतांना कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे.

गेल्या तीन दिवसापासून कोसळत असलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होवून वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढत आहे.खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेती जलमय झाली आहे तर ओहळ आणि बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी असलेल्या जुन्या फरशी पूलावरून पाणी जात आहे. नोकरदारांची कामावर जाताना तारांबळ उडत आहे.

संततधार पावसामुळे पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नवी मुंबईस पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच यांनी गावामध्ये सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

 तालुक्यातील धावरी नदीकाठी जाऊ नये तसेच नदीकाठच्या फार्महाऊसवर थांबू नये व मासेमारीसाठी कोणी गेले असले तर त्यांना बोलावून घ्यावे, विशेषतः  आसरे व जांभिवली परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क राहवे, असे आवाहन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply