मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम


खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खोपोली शहर निर्जंतुक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम शनिवारपासून (दि. 28) सुरू करण्यात आला. यात खोपोली नगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू केली आहे. यातून संपूर्ण निर्जंतुक व सेनेटाईज करण्यात येणार आहे. खोपोली नगरपालिका, पोलीस प्रशासन व येथील नागरिकांनी या मोहिमेचे मनापासून स्वागत केले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अतिक खोत, सदस्य निजामुदिन जलगावकर, अबू जलगावकर यांच्या नेतृत्वाखाली खोपोली मुस्लिम समाज वेल्फेअरचे अन्य सदस्य मेहनत घेत आहेत. दरम्यान, खोपोली शहरातील रस्त्यावरील व रहिवासी भागातील वाहने व नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महत्त्वाचे चौक व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्याची मोहीमही शनिवारी राबविण्यात आली.