Breaking News

मतदान केंद्रावरही आता महिलाराज

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून

ओळखली जाणार आहेत.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार असून, याला सखी मतदान केंद्र असे म्हटले जाणार आहे.

सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सखी मतदान केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. सखी मतदान केंद्र अधिकाधिक आर्कषक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफसफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे.

सखी मतदार केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. या मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. प्रत्येक मतदारसंघातून अशा एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीकच्या केंद्रांची, तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्‍यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply