महाड : प्रतिनिधी – कोरोनाबाबत प्रशासकीय तयारी आणि घेण्यात येणारी खबरदारी याबाबत आमदार भरत गोगावले यांनी महाड उपविभागीय कार्यालयात प्रमुख अधिकार्यांजवळ चर्चा केली. या वेळी खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला सूचित केले असता बंद दवाखाने दिसल्यास कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रशासनाने दिले.
महाड उपविभागीय कार्यालयात आमदार भरत गोगावले यांनी प्रमुख अधिकार्यांजवळ कोरोनाबाबत घेण्यात येत असलेल्या खबरदारीबाबत चर्चा केली. या वेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आय. यु. बिरादार, गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे, नायब तहसीलदार घेमुड, नपाचे मुख्याधिकारी जीवन पाटील उपस्थित होते.
ज्या कुटुंबांचा उदरनिर्वाह मोलमजुरी, कष्टाची कामे, लघु व्यवसाईक, कारागीर आणि आदिवासी यांच्यापुढे जीवन जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला असून त्यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगून कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे असेही स्पष्ट केले. या वेळी डॉ. भास्कर जगताप आणि डॉ. बिरादार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील काही औषधांचा तुटवडा होत असल्याचे सांगितले.
रास्त धान्य दुकानातून धान्यपुरवठा शासन करणार आहे, असे तहसीलदार पवार यांनी सांगितले.