Breaking News

अवैध मासेमारीप्रकरणी अलिबागेत तीन नौका जप्त; मत्स्य विभागाची कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी

समुद्रात एलईडी आणि पर्ससीनच्या माध्यमातून मासेमारी करण्यास शासनाची बंदी असतानाही काही मच्छीमार हे अवैधपणे मासेमारी करीत असतात. अलिबाग समुद्रात अशी अवैध मासेमारी करणार्‍या साखर आक्षी बंदरातील एक एईडी तर दोन पर्ससीन करणार्‍या तीन बोटीवर कारवाई करून मत्स्य विभागाने जप्त केल्या आहेत. तीनही नौका मालकांवर मत्स्य विभागाकडून कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास  नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारी विरोधात कमालीचा सक्रीय झालेला दिसून येत आहे. सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सुधारित सागरी अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाच्या अधिकार्‍यांना दिले होते. साखर आक्षी बंदराच्या हद्दीत अवैधपणे एलईडी आणि पर्ससीनद्वारे मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली होती. बंदरात अवैधपणे मासेमारी करताना मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मुंबई संजय माने यांच्यासह परवाना अधिकारी. तुषार वाळूज, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी गणेश टेमकर, महादेव नांदोस्कर यांच्या पथकाने एक एलईडी आणि दोन पर्ससीन नौका पकडल्या. एल.ई.डी. धारण केलेली दत्त साई  (आयएनडी-एमएच-3 एमएम-232) ही पर्ससीन नौका, वैभव लक्ष्मी प्रसन्न (आयएनडी-एमएच-3 एमएम-2250) ही अवैध पर्ससीन नौका, तसेच आणखी एक अवैध पर्ससीन नौका ज्यावर नाव व क्रमांक नाही, अशा तीन नौका मत्स्य विभागाच्या पथकाने जप्त केल्या आहेत. प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. पकडलेल्या नौका मालकांवर याबाबत नवीन कायद्यानुसार अवैध एलईडी वापरल्यापोटी पाच लाख रुपये दंड व नौका, जाळे व इतर साहित्य जप्त करण्याची तरतूद आहे. तसेच अवैध पर्ससीन मासेमारीस एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध एलईडी आणि पर्ससीन मच्छीमार नौकावर कारवाईचा बडगा उचलला गेला असल्याने भविष्यात ही मासेमारी बंद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply