Breaking News

दहशतवाद-संवाद एकत्र राहू शकत नाहीत : सुषमा स्वराज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

 पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, असे पाकिस्तानला त्यांनी खडसावले आहे.

 जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘भारतीय जग ः मोदी सरकारचे परराष्ट्र धोऱण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे, असेही त्या या वेळी म्हणाल्या. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणार्‍या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानी लष्कर जैशच्या मदतीने आमच्यावर हल्ला का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला, तसेच पाक जैशला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवतो. असे असताना जेव्हा दहशतवादाने पीडित देश याचे उत्तर देतो, तेव्हा तुम्ही दहशतवाद्यांच्या वतीने त्या देशावरच हल्ला करता, अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत, तर मग त्यांनी मसूद अझहरला आमच्याकडे सोपवावे, अशी मागणीही या वेळी सुषमा स्वराज यांनी केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply