अलिबाग ः जिमाका
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून संस्थेतील सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काही आवश्यक सूचना केल्या आहेत.
सर्व गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर्स ठेवून प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावे, इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणार्या किराणा, भाजीपाला इ. गोष्टींची मागणी संकलित करावी व त्यानुसार जवळच्या किराणा, भाजीपाला पुरवठा करणार्या शॉपधारकास जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर (सदस्यनिहाय) देऊन सामान गेटवरच मागवून घेण्यात यावे, एकेका सदस्याच्या घरी सिक्युरिटीमार्फत किराणा सामान पोहचवावे, अथवा प्रत्येक घरातील एका सदस्यास बोलावून गेटवर त्याचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
संस्थेचे सदस्य तातडीच्या न टाळता येणार्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकार्यांनी घ्यावी, तसेच सोसायटीचे क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य वा लहान मुले एकत्र येणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता वा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सोसायटीमधील परिसर स्वच्छ ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. सोसायटीमधील सदस्यांकडे बाहेरील व्यक्ती राहावयास आल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांना तत्काळ कळविणे बंधनकारक आहे. या सर्व मार्गदर्शक सूचनांचे सर्व गृहनिर्माण संस्थांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
- ‘कोरोनाला परतवून लावण्यासाठी घरातच राहा’
माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. जगभरातील तीन लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण
झाली असून 30 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. माणगावकरांनी
कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून घरातच राहण्याचा दृढनिश्चय
करावा, अशी विनंती माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव
यांनी केली आहे. महत्त्वाच्या कामास्तव बाहेर पडणे गरजेचे झाल्यास शक्यतो सॅनिटायझरची बाटली जवळ
ठेवा. तोंडाला मास्क लावा. आपल्या चुकांमुळे देशाचे नुकसान होऊ नये याचा सर्वांनी
विचार करून येणार्या काळात याबाबत जागरूकता बाळगून माणगावनगरी कोरोनामुक्त ठेवू
या, अशी विनंती त्यांनी
केली आहे.