रसायनी : प्रतिनिधी : सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ जाणवत असून अनेक गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करून देण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही पडघे गाव दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पडघे गावात पाणीटंचाईच्या झळा गेल्या कित्येक वर्षात तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. या गावाला गेल्या तीन वर्षे पाण्याची झळ लागल्याने पडघ्यातील राधाकृष्ण मंदिर परिसर, पाटील आळी, जोशी आळी या भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत 28 जानेवारी 2018 रोजी पनवेल महानगरपालिका उपायुक्तांना ग्रामस्थांच्या सह्यानिशी पत्र देण्यात आले होते. ही समस्या येत्या आठवड्यात सोडविण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थ आशेवर होते, मात्र परिस्थिती जैसे थेच राहिली. पडघे एमआयडीसीत याअगोदर सात एमएलडी पाणी यायचे. यानंतर 25 टक्के कपात होऊन पनवेल महानगरपालिकेकडून दोन पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. पडघे गावाची लोकसंख्या 12 हजारापेक्षा जास्त असतानाही एमआयडीसी पाणीकपातीमुळे गावाला झळ लागली आहे. दरम्यान, गावातील महिला वर्ग पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. याकरिता महिलांनी पनवेल महानगरपालिकेवर तळोजा पर्यावरण अध्यक्ष सुनील लहू भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला. या वेळी अतिरिक्त आयुक्त रसाळ यांची भेट घेऊन पाणीटंचाईची माहिती दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्तांनी जल अभियंता उल्हास वाड यांच्याशी चर्चा करून पडघे गावासाठी दिवसाला तीन टँकर पाणी देऊन त्यावर जीपीएस यंत्रणा लावण्यात येईल, गावात इलेक्ट्रीक मोटार वापरून पाणी घेणार्यांवर कारवाई करण्यात येईल, एमआयडीसीकडून सहा इंच पाईपलाईनसाठी सहकार्य करू, असे आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रसाळ यांनी बोलताना सांगितले.रसाळ यांच्याकडून पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थ सुनील लहु भोईर यांनी आभार मानले.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper