कळंबोलीत आणखी चार जवानांना लागण; पनवेल तालुक्यातील एकूण संख्या आठवर
पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या सीआयएसएफच्या एकूण पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. त्यामुळे कळंबोली हादरली आहे. आता पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे.
कोरोनाची लागण झालेले पाचही जवान मुंबई विमानतळावर सुरक्षेचे काम करतात तसेच ते कळंबोली येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कॅम्पमध्ये राहतात. यापैकी एक जवान कोरोनाने बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आणखी चार जवानांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
याआधी कामोठ्यातील दोघांना कोरोना झाला होता, तर खारघरमधील संशयिताचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.
खारघरचा संशयित रुग्णही पॉझिटीव्ह
खारघरमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने या स्मार्ट सिटीत घबराट पसरली होती. पनवेल महापालिकेच्या अधिकार्यांमार्फत त्याला मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन त्याचे रिपोर्ट कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. ते पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, संशयित रुग्णाचा संचार झालेले खारघरमधील डी-मार्ट बंद करण्यात आले आहे.