महाड ः प्रतिनिधी
महाडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या परिचारिकेवर ग्रामीण रुग्णालयातच उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील मोरेवाडीतील कोरोना झालेल्या व्यक्तीला 4 मे रोजी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते. त्या वेळी सदरची परिचारिका कोकरे तर्फे नाते येथून आलेल्या व्यक्तीला तपासण्यासाठी त्याच्या संपर्कात आली होती.
त्यानंतर त्या रुग्णावर माणगावमधील राठोड रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. 7 मे रोजी या रुग्णाचा स्वॅबचा अहवाल पाठविण्यात आला होता. तो रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आला आणि दुसर्याच दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर,
परिचारिका आणि नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. बुधवारी ग्रामीण रुग्णालयाच्या या परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, मात्र कोकरे तर्फे नाते येथील पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी या परिचारिकेला ग्रामीण रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करून घेतले आहे. सध्या तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, 4 मेपासून सदर परिचारिकेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. महाड तालुक्यात आढळून आलेली ही पहिलीच महिला परिचारिका आहे. ही परिचारिका ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या कॉलनीत राहत होती. ती राहत असलेला सर्व परिसर महाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सील केला आहे.