पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार
लॉकडाऊनदरम्यान पनवेल तालुक्यातील रेशन दुकानात गहू आणि तांदूळ यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला आहे. आठवड्याभरात सर्व दुकानांमध्ये रेशनचे धान्य पोहचवली जाईल, आता साखर देखील उपलब्ध होईल, अशी माहिती पुरवठा अधिकार्यांनी दिली आहे. पनवेल तहसील हद्दीत येणार्या एकूण 193 रेशन दुकानांपैकी 60 दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ यांचा पुरवठा करण्यात आला असून आठवड्याभरात सर्व दुकानांमध्ये रेशनचे धान्य पोहचवले जाणार असून त्याच्यासोबत साखर देखील उपलब्ध झालेली आहे. ती देखील लवकरच सर्व दुकानांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, रेशन दुकानांमधून पुढील तीन महिन्यांचे धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र राज्यात एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य मिळणार नाही, तर दर महिन्याला देण्यात येईल. रेशन दुकानांमधून कार्डधारकांना प्रति महिना प्रतिव्यक्तीअतिरिक्त पाच किलो तांदूळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंजुरी मिळाली आहे, परंतु अजून हे धान्य उपलब्ध झालेले नाही. लवकरच त्याची उपलब्धता झाल्यानंतर मोफत देण्यात येणार आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा लोकांना धान्य देण्यासाठी यासंदर्भात अजून तरी कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. परंतु भविष्यात त्याबाबत निर्णय घेण्यात आल्यास तशीदेखील व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पनवेल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.