पनवेल : प्रतिनिधी
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्याने गरीब, गरजू लोकांना अन्न देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या, पण ही मदत करताना काहींनी आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत असल्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी रोज गरजूंना विविध संस्था अन्नवाटप करीत आहेत. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत गर्दी जमते आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवला जात आहे. गरजूंना दिलेले जेवण अनेकांनी गटारात टाकलेलेही आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
खारघरमध्ये कोणीही येतो आणि पुलाखाली जो भिकारी वर्ग आहे तिथे अन्नाची पाकीटे वाटतात व त्याचे फोटो, व्हिडीओ काढून निघून जातात. ते गेल्यानंतर हेच भिकारी त्या अन्नाची नासाडी करतात. ते तरी काय करतील, कारण प्रत्येकजण येतो आणि त्यांना गरज आहे का, याची खात्री न करता पाकीट देतो. आमच्यासारखे दिव्यांग ज्यांना खरंच गरज आहे ते रस्त्यावर येऊ शकत नाहीत. त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचतच नाही.
-श्रीधर दरेकर, दिव्यांग