Breaking News

आपला पगार किती? बोलता किती?

आमदार पडळकरांनी राऊतांना झापले

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद असा केला होता. आता यावर पडळकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती? असा टोमणा पडळकर यांनी राऊतांना मारला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना सणसणीत पत्र लिहिले असून, ट्विट करून ते शेअर केले आहे. ‘सामना’ मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करीत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच संजय राऊत, असे कॅप्शन त्यांनी ट्विटला दिले आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुख-दुःखाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या धनगर समाजाचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य  मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे, पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणार्‍या ‘सामना’कडून दुसरी अपेक्षाही काय करणार, असा खोचक टोला लगावला आहे. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळे लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमधे असणार्‍या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरूये याचा अंदाज तरी कसा येणार, अशा शब्दांत आमदार पडळकर यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. हे पत्र व्हायरल होत आहे.
‘तो’ माझा संस्कार आणि संस्कृती नाही
आदरणीय संजय राऊत साहेब, मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबर्‍या, चमचा असे उद्बोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख ’फेकूचंद पडळकर’ असा केला आहे. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता, पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आई-वडिलांनी दिला, असेही आमदार पडळकर यांनी राऊत यांना लिहिलेल्या पत्रात नमूदकेले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply