Breaking News

संचारबंदी आदेशाचा भंग; वाहनचालकांवर कारवाई

महाड ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यानुसार विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 500पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अनेक वाहने ताब्यात घेतली आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शासनाकडून वारंवार केले जात असताना याबाबत नागरिकांना फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून आल्यामुळे अखेर प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली. संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर रायगड जिल्हाधिकार्‍यांनी 28 मार्चपासून सर्व प्रकारची हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, टॅक्सी, रिक्षा यांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असताना या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रशासनाला आढळून आले. अखेर गुरुवारी संपूर्ण दिवस पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई करून अनेक वाहने जप्त केली. शहरातील चवदार तळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दस्तुरी नाका या ठिकाणी तपासणी नाका उभारण्यात आला होता. शहरामध्ये येणार्‍या त्याचबरोबर जाणार्‍या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी वाहनचालकांवर कारवाई केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply