महाड : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना चाइल्ड फंड इंडिया आणि दि हंस फाऊंडेशनच्या वतीने मोफत साहित्य आणि स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. महाड संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
महाड तालुक्यात 6 ऑगस्ट आणि नंतरच्या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याचा सर्वाधिक फटका आदिवासी बांधवांना बसला आहे. त्यांची कमकुवत आणि झोपडीवजा घरे या अतिवृष्टी आणि वादळी पावसापुढे टिकू शकली नाहीत. बहुतांशी आदिवासींचे संसार उघड्यावर आले. महाड तालुक्यातील अशा सुमारे एक हजार कुटुंबांना तसेच पूरग्रस्तांना चाइल्ड फंड इंडिया आणि दि हंस फाऊंडेशनच्या वतीने मोफत साहित्य आणि स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. गुरुवारी (दि. 26) सकाळी कोळोसे आदिवासीवाडी येथे 110 कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी दोन चटया, ताडपत्री, बकेट, मग, स्वच्छता किट, सॅनिटरी नॅपकीन, दोन सोलापुरी चादरी, जिरप बॅग, मच्छरदाणी, पाणी शुध्दिकरण गोळ्या यांचा समावेश आहे. या स्वच्छता साहित्याचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शनही महिलांना देण्यात आले.
या वेळी चाइल्ड फंड इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप खांबट, प्रोजेक्ट कॉडिनेटर शांताराम नंदा, अरविंद सुतार, प्राईड इंडियाचे यशवंत गायकवाड, नितीन पवार, अनिकेत चेरफळे, वैशाली जाधव उपस्थित होते.