पनवेल : बातमीदार – करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, मद्याची विक्री सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कामोठेतील सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर संशयास्पद उभ्या असलेल्या सफेद रंगाच्या स्कॉर्पिओची गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता, या गाडीच्या डिकीमध्ये बिअरच्या बाटल्यांचा बॉक्स आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गाडीसह बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी गाडीचालक आनंद मौर्या याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने त्या कामोठे सेक्टर-34मधील संजय पाटील याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी श्री गणेश सोसायटीत जाऊन पाहणी केली असता, संजय पाटील याने त्याच्या घरामध्ये बिअरच्या बाटल्यांचा साठा केल्याचे तसेच त्या विकत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणावरून 13 हजार रुपये किंमतीच्या बिअरच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी आनंद मौर्या व संजय पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
वाशी पोलिसांनी गुरुवारी दुपारी वाशी सेक्टर-10मधील संजोग बार अॅण्ड रेस्टॉरंटवर कारवाई करून तब्बल 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. संजोग बार अॅण्ड रेस्टॉरंटमधून छुप्या पद्धतीने मद्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी बारचा मॅनेजर जया सिना चौटा (67), हेल्पर सीताराम नागेश्वर (22), निरंजन फुलीकर असुरु (24) आणि वेटर सेल्वा कुमार राजा पांडीयन (42) हे विदेशी मद्याची विक्री करताना आढळून आले. त्यामुळे वाशी पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
अमली पदार्थांची विक्री; तरुणाला अटक
पनवेल : बातमीदार – करोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असतानाही गांजा, चरस आणि दारूची विक्री करणार्या शरीफ गणी शेख (26) याला परिमंडळ-1मधील अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाने तुर्भे नाका येथे छापा मारून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 67 हजार रुपये किंमतीचा गांजा, चरस आणि दारूचा साठा जप्त केला. या कारवाईच्या वेळी शरीफचा पिता पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे देशातील सर्व प्रकारचे व्यवहार, कामधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. त्या शिवाय मद्याच्या खरेदीविक्रीवरसुद्धा पोलिसांनी बंदी घातली आहे. असे असतानाही तुर्भे नाका येथील आंबेडकर नगर भागात राहणार्या पिता-पुत्रांकडून आपल्या घरातून गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-1मधील अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी तुर्भे नाका येथील शरीफ गणी शेख याच्या घरावर छापा मारला. शरीफ शेख याच्याजवळ 742 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये 78 ग्रॅम वजनाचा चरस व विदेशी दारूचे दोन बॉक्स सापडले. त्यामुळे पोलिसांनी घरातून 2 लाख 67 हजार रुपये किमतीचा गांजा, चरस आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी शेख पिता-पुत्रावर तुर्भे एमआयडीसी पोलिस गुन्हा
दाखल करून शरीफ गणी शेख याला अटक केली.